About

Tuesday 23 October 2012

चार्वाक दर्शन ३ : शोषणाधारित धर्म व्यवस्थेविरुद्धचा आदिम लढा


चार्वाक दर्शनावरून मागील काही दिवसांत रोखठोक ब्लॉगवर भरपूर प्रतिक्रिया येत आहेत. त्यातील अनेकांसाठी चार्वाकांचे विचार धक्कादायक ठरल्याचे त्यांच्या प्रतिक्रियांवरून दिसत आहे. तर अनेकांचे कुतूहल चार्वाकांविषयी चाळवले गेले आहे. अनेकांना चार्वाक विचार आवडल्याचेही दिसत आहे. चार्वाकांचे विचार हे श्रद्धाळू लोकांना पचवायला तसे जडच आहेत. हरकत नाही. यानिमित्ताने चार्वाक दर्शनावर जितके वाद विवाद झडतील तेवढे स्वागतार्ह्यच आहेत. कारण यातूनच आपल्या धर्म विषयक आणि एकूणच जीवनविषयक पायाभूत संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होईल.

    मुळात जडवादी आणि चैतन्यवादी यांच्यातील हा वाद सनातन आहे तितकाच तो विश्वव्यापक ही आहे. जे जडातून चैतन्य निर्माण झाल अस मानतात ते जडवादी आणि जे चैतन्यातून जड निर्माण झाल अस मानतात ते चैतन्यवादी किंवा ईश्वरवादी. मोक्ष, आत्मा आणि देव यांना मानणारे श्रद्धाळू ईश्वरवादी आणि यांचे अस्तित्व नाकारणारे जडवादी असे दोन स्पष्ट तट जगभरातील धार्मिक परंपरांमध्ये दिसतात. तुलनेने जडवादी परंपरा अधिक जुनी आहे. प्राथमिक अवस्थेतील मानव हा या विश्वाकडे जडवादी दृष्टीनेच पाहत होता. पुढे निसर्गातील देवतांना त्याने देव मानायला सुरवात केली असली तरी तिथे प्रार्थना करण्याशिवाय कर्मकांडाचे प्राबल्य अजून नव्हते. या परंपरांमध्ये कर्मकांडाचा शिरकाव पुढील काळात हळूहळू होत गेला. या दृष्टीने विचार केला तर जडवादाचे तुलनेने असलेले प्राचीनत्व प्रत्ययास येते.


चार्वाक आणि देवाचे अस्तित्व




चार्वाक तत्वज्ञान हे सार्वकालिक आहे. कोणत्याही काळातील विचारवंतांना आकृष्ट करून घेण्याचे सामर्थ्य त्यात आहे. चार्वाकांच्या पायाभूत संकल्पना या अतिशय स्पष्ट आहेत. त्यात कोणतीही चलाखी व भ्रामकता नाही. चार्वाक दर्शना इतके सुस्पष्ट प्रामाणिक आणि परखड तत्वज्ञान धर्माच्या इतिहासात अन्य कोणतेही नाही. विश्व ज्या त्या वस्तूच्या ( वस्तू – द्रव्य, material )  स्वभावधर्मानुसार विकसित झाले. इथे देवाने विश्व वगैरे निर्माण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.


" ईश्वर अभावात् , स्वभावेन इव "


देवाचे अस्तित्व, आत्म्याचे अस्तित्व, मृत्यूनंतरचे पारलौकिक जीवन, पुनर्जन्म, कर्मकांड या सर्व कल्पनांना चार्वकांनी एकाच वेळी नाकारले आहे. असे करण्याचे कारण त्यांचे काही मुलभूत प्रश्न. ज्यांची तर्कशुद्ध व विज्ञाननिष्ठ उत्तरे देणे आजही ईश्वरवादी लोकांच्या आवाक्याच्या बाहेरचे आहे. जमल्यास वाचकांनी कमेंट मध्ये प्रयत्न करून पाहावा.


१.     ईश्वरानं विश्व निर्माण केलं तर त्याला कोणी निर्माण केलं ?
२.    जर ईश्वर स्वयंभू असेल तर विश्व का स्वयंभू नसावं ?  
३.    ईश्वर जर निर्गुण-निर्विकार तर त्याला विश्व निर्माण करण्याची इच्छा मुळात का झाली ?
४.   इच्छा आली की आसक्ती आली, आसक्ती आली की बंधन येतं, मग ईश्वर अमर्याद स्वतंत्र कसा असेल
५.   आणि जर तो अमर्याद स्वतंत्र नसेल तर तो ईश्वर कसला ?





या तीक्ष्ण आणि भेदक प्रश्नांपुढे चैतन्यवाद्यांची मती कुंठीत होणे साहजिक आहे. मुळात जगातील सर्वच धर्म कल्पितांवर आधारलेले असतात. सामान्यांच्या गळी मोठ्या प्रमाणावर धर्मकल्पना उतरवण्यासाठी ते आवश्यकही असाव कदाचित. तुमचा येशू कुमारी मातेच्या पोटी जन्मला हे कसे शक्य आहे ? मेडिकल सायन्स च्या नियमाविरुद्ध आहे हे, किंवा मृत्यूनंतर देखील तो परत आला हे असंभव आहे, तो पाण्यावरून चालला हे भौतिकशास्त्राच्या विरुद्ध आहे असा वाद आपण ख्रिश्चन धर्मीयांशी घातला तर ते चिडणे आणि अश्या प्रश्नांची तर्क दृष्ट्या समाधानकारक उत्तरे त्यांच्यापाशी नसणे हेही स्वाभाविक आहे . न्युटन, ग्यालिलिओ, लिओनार्दो अश्या ख्रिश्चन धर्मपरंपरांना धक्का देणा-या पाश्चात्य जडवादी शास्त्रज्ञांना चर्चने दिलेला त्रास सर्वश्रुत आहे. किंवा इस्लाम धर्मियांना महंमद हा मोरासारख्या दिसणा-या स्त्रीचेहरा असणा-या प्राण्यावर बसून अल्लाह च्या भेटीला जाणे अशक्य आहे. ही एक भ्रामक कथा आहे असे सांगितल्यास त्यांच्या धार्मिक उन्मादाचा सामना करावा लागेल.

तथापि चार्वकांनी अश्या कोणत्याही विरोधाची तमा बाळगलेली दिसत नाही. ईश्वरवादावर त्यांनी चढवलेला हल्ला हा कोणत्याही एका धर्माच्या विरोधात नाही. चार्वाकांना वैदिक धर्म विरोधी समजण्याचे कारण नाही. त्याकाळात हिंदुस्थानात एकमेव असणारा धर्म म्हणून त्यांचे विचार वैदिक धर्म परंपरांच्या अनुषंगाने आहेत इतकच. तात्कालिक दृष्टीने विचार न करता एक विशुद्ध जडवादी तत्वज्ञान म्हणून चार्वाक दर्शनाकडे पाहीले असता हा सर्वच धर्मातील ईश्वर वाद्यांवर सार्वत्रिक आणि सार्वकालिक स्वरूपाचा प्रखर हल्ला आहे हे ध्यानात येत.


भूतात्मकं जगत्। स्वभावं जगतः कारणं आहुः।
न परमेश्वरः अपि कश्चित्।
न पुनर्जन्मः न मोक्षः। मरणं एव मोक्षः।
न स्वर्गो नापवर्गो वा नैवात्मा पारलौकीक:।
नैव वर्णाश्रमादीनां क्रीयाश्च फलदायिका :।।


चार्वाकांनी एकूणच सर्व धर्मकल्पनांच्या मुळावरच घाव घातला आहे. ईश्वरच नसेल तर धर्माचे अस्तित्व ते काय उरले ? देवाचे अस्तित्व अमान्य करण्याचे कारण धर्म आणि देव यांच्या नावावर समाजात धर्ममार्तडांनी चालवलेले सामान्यांचे शोषण आणि समाजात वर्ण व्यवस्थेच्या नावावर माजवलेली असहिष्णू अवव्यवस्था हेच आहे हे वाचकांनी ध्यानात घ्यावे. शिवाय पारलौकीकाच्या मागे लागून लौकिक जीवनाकडे धर्माने फिरवलेली पाठ हे देखील महत्वाचे कारण आहे.


चार्वाक आणि ज्ञान संपादनाची प्रमाणे

    
 चार्वाकांना फक्त दोनच ज्ञान साधने मान्य आहेत. प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षनिष्ठ अनुमान. जे इंद्रियांना प्रत्ययास येते तेच प्रमाण बाकी सर्व खोटे आहे यावर चार्वाक ठाम आहेत. अनुमान प्रामाण्याच्या बाबतीत चार्वाक जास्त कठोर आहेत. कारण त्याला मर्यादा आहेत. प्रत्यक्षानिष्ठ अनुमान म्हणजे एखादी गोष्ट आता जरी प्रत्यक्ष दिसत नसली तरी नंतर का होईना तिचा पडताळा घेता आला पाहिजे. अनुमान हे अंतिम प्रमाण मानण्यास चार्वाकांचा नकार आहे कारण अनुमान आले कि काही प्रमाणात संदेह आला. कशाच्या तरी अनुभवाच्या शिदोरीवर कोणीतरी काही अनुमान करतो. उदा. जिथे अग्नी असते तिथे धूर असतो. हा आपला नित्याचा अनुभव आहे. यावरून जिथे धूर आहे तिथे अग्नी आहे असा अंदाज बांधण्याकडे कल होतो. डोंगरावर धूर आहे म्हणजे तेथे अग्नी आहे असे अनुमान काढता येईल. आणि असे अनुमान फसन्याचीही शक्यता असते. किंवा लोखंड तप्त असते तेव्हा त्यात अग्नी विद्यमान असतो परंतु त्यातून धूर निघत नाही. अनुमान प्रामाण्य अश्या प्रकारे चार्वकांनी अंशत: बाद ठरवले आहे .


खेरीज चार्वाक संभवनीयतेचा देखील विचार करतात. प्रत्यक्ष व्यवहारात प्रत्येक ठिकाणी जे प्रत्यक्ष प्रमाण मागणे कदाचित व्यवहार्य ठरणार नाही. काही ठिकाणी आपणास अनुभवावर आधारित गृहीतके विचारात घ्यावी लागतात. अनुमान म्हणजे जास्तीत जास्त संभवनीय असलेले सत्याच्या जवळ असलेले प्रमाण आहे. इथे आपल्याला चार्वाकांचा वैज्ञानिक दृष्टीकोन प्रत्ययास येतो. विज्ञानामध्ये आज प्रस्थापित झालेला सिद्धांत उद्या नवीन संशोधनाच्या आधारे कोणीतरी खोटा पाडू शकत. आज जी गोष्ट विज्ञानाधारे सत्य म्हणवते ती उद्या बदलू शकते. शेवटी सत्य म्हणजे तरी काय असते ?


सत्य म्हणजे एका अर्थाने टोकाची संभवनीयताच असते.

         


शब्द प्रामाण्य तर चार्वाक सपशेल नाकारतात. शब्द हे मुळात निरर्थक असतात. त्याचे रूढ अर्थ हे परंपरेने त्यांना चिकटलेले असतात. उदा. एका कालखंडात विशिष्ट अर्थाने वापरला जाणारा शब्द नंतरच्या काळात वेगळ्याच अर्थाने वापरला जातो अशी हजारो शब्दांची उदाहरणे आपणास भाषाशास्त्रज्ञ देऊ शकतील. शिवाय दुसरे कारण म्हणजे शब्द हे कोणीतरी उच्चारलेले असतात. नंतर कोणीतरी त्यांचे संकलन करते. (कोणीतरी त्यात भेसळ देखील करते.) इथ शब्द उच्चारणा-याची पात्रता काय ? संकलन करणा-याची पात्रता आणि हेतू काय ? हे वादग्रस्त प्रश्न आहेत. अपौरुषेय वेदांतील शब्द प्रमाण मानायचे झाले तर वेदात जर्भरी, तुर्भरी असे शब्द येतात. त्यांचा अर्थ कसा लावायचा व असे निरर्थक शब्द कसे प्रमाण मानावयाचे ? शिवाय यम आणि यमीच्या कथेचा (अभ्यासू वाचकांना ही कथा माहित असावी )  उल्लेख करून चार्वाक म्हणतात हे असले शब्दप्रामाण्य काय कामाचे ?
        

।। प्रत्यक्षं एव प्रमाणः  न कश्चित् आगमः ।।



चार्वाक आणि कर्मकांड



चार्वाकांच्या नास्तिक भासणा-या विचारधारेचे मूळ तात्कालिक समाजात देव आणि धर्म यांच्या नावाखाली लोकांची चाललेली पिळवणूक आणि शोषण हे आहे. त्यामुळे प्रत्यक्ष देवाचे अस्तित्व नाकारणारे चार्वाक कर्मकांडावर किती कठोर टीका करत असतील याची कल्पना करता येते. चार्वकांचे उपलब्ध साहित्य कर्मकांडावर इतका करडा प्रहार करते तर त्यांचे जे साहित्य उपलब्ध नाही किंवा हेतुपुरस्पर अनुपलब्ध करण्यात आलेले आहे त्यात त्यांनी कर्मकांडाची कशी भंभेरी उडवली असेल याची देखील कल्पना येऊ शकते. चार्वाकांचा विशेष राग तत्कालिक यज्ञ पद्धतीवर व त्यात देण्यात येणा-या पशुबळीच्या प्रथेवर आहे. इथे त्यांचा एक प्रातिनिधिक श्लोक देतो जो संपूर्ण यज्ञविधीच्या फलव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उभे करतो.


पशुश्वेन्नीहत: स्वर्ग ज्योतिष्टोमे गमिष्यति ।
स्वपिता यजमानेन तत्र कस्मान्न हिंस्यते ।।

अर्थात जोतिष्टोम यज्ञात मारलेले पशु जर स्वर्गात जातात तर यजमान स्वत:च्या पित्याला का यज्ञ वेदीवर बळी देत नाहीत.


मृतानामपि जन्तुनां श्राद्धं चेतृप्तीकारणम्
निर्वाणस्य प्रदिपस्य स्नेह: प्रज्वलयेच्छीखाम्

अर्थात जर मेलेल्या जीवांची तृप्ती श्राद्धाद्वारे होऊ शकत असेल तर तुपाने विझलेल्या दिव्याची ज्योतही मोठी होईल.




स्वर्गस्थिता यदा तुप्तीम् गच्छेयुस्तत्र दानत:
प्रासादस्योपरीस्थानामत्र कस्मान्न दीयते

अर्थात भूलोकात केल्या दानामुळे जर स्वर्गात असलेल्या पितरांची तिथल्या तिथे तुप्ती होत असेल तर इमारतीत वरच्या मजल्यावर राहणा-या लोकांना अन्न येथे खालच्या मजल्यावर का देत नाहीत ?



ततश्च जीवनोपायो ब्राह्म ब्राह्मनैविहीस्त्विह
मृतांनां प्रेतकार्याणि न त्वन्यद्विद्यते क्वचित्

अर्थात ब्राह्मणांनी स्वत:च्या उपजीविकेसाठी योजलेले हे सर्व उपाय आहेत अन्यथा इथे मेलेल्यांसाठी प्रेतकार्ये कदापी अस्तित्वात नसती.

उपरोक्त श्लोकांवरून वाचकांच्या लक्षात आलेच असेल की चार्वाक म्हटले की धर्ममार्तंड का इतके हादरतात , चार्वाक दर्शन खोटे , दांभिक आणि भोगवादी आहे असे ठरवण्याची त्यांची का इतकी धडपड असते , का बहुतांश पुराणे आणि धर्मग्रंथात चार्वाकांची इतकी निंदा केली गेली आहे ? चार्वाकानी ज्या कल्पितांवर धर्माचा पाया रचला गेला आहे  त्या सगळ्या  कल्पितांनाच समूळ हादरा दिला आहे. धर्माचे स्वयंघोषित ठेकेदार आणि धर्म आणि धर्म कल्पना यात हितसंबंध गुंतलेले प्रस्थापित शोषणकर्ते यांच्या मुळावरच चार्वकांनी आपल्या तत्त्वज्ञानातून घाव घातला आहे.

चार्वाक मत जनसामान्यांमध्ये का रुजू शकल नाही ? चार्वाक मत दडपून टाकण्याचे देश काळ आणि समाज यांच्यावर कोणते दुष्परिणाम झाले याचा वेध घेऊ पुढील लेखात ...

                 सुहास भुसे.
               ( रोखठोक साठी )  


 या लेखमालेतील इतर लेख –



 

    

11 comments:

  1. Replies
    1. धन्यवाद प्रशांत ..!!

      Delete
  2. छान माहिती आहे.बहुजनांच्या हिताची ठरेल.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अनामिक...!!

      Delete
  3. १. ईश्वरानं विश्व निर्माण केलं तर त्याला कोणी निर्माण केलं ?
    २. जर ईश्वर स्वयंभू असेल तर विश्व का स्वयंभू नसावं ?
    ३. ईश्वर जर निर्गुण-निर्विकार तर त्याला विश्व निर्माण करण्याची इच्छा मुळात का झाली ?
    ४. इच्छा आली की आसक्ती आली, आसक्ती आली की बंधन येतं, मग ईश्वर अमर्याद स्वतंत्र कसा असेल ?
    ५. आणि जर तो अमर्याद स्वतंत्र नसेल तर तो ईश्वर कसला ?


    iawarane viswachi nirmiti keli.
    iawar mhanje kay. tar apan nisargatil vividh shaktinna iswar manale ahe
    e.g bramhan mhanaje bramha.
    bramhandatil vegvelya ghatakanni milun viswa nirman zale mhanajech bramha ne viswa nirman kele ha sadha arth ahe. bramhand swayambhu ahe karan te kashatahi samavlele nahi. pan viswa he bramhandat yete mhanje te swayanbhu kase asel?

    ReplyDelete
  4. sann
    एक चांगला प्रयत्न असेच मी म्हणेन आपल्या या कमेंट बद्दल .
    आपण पुन्हा एकदा या प्रश्नांचा सखोल विचार करावा असे मला वाटते .
    मी जेव्हा पहिल्यांदा या प्रश्न मालिकेचा विचार केला तेव्हा मी तर पूर्ण संभ्रमित झालो होतो .
    आणि एक गोष्ट विश्व आणि ब्रम्हांड दोन्ही एकच .
    विश्व म्हणजे हे जग नव्हे ...इथे अभिप्रेत असलेले विश्व आणि आपण म्हणत असलेले ब्रह्मांड एकच .

    ReplyDelete
  5. anakhi ek jara vegle ahe patrika , bhavishya yavar apale kay mat ahe apan lihinar ahat ka jar ekhadi grahshanti vagere karane yavar mala bolayache ahe

    ReplyDelete
    Replies
    1. भविष्यकथन हे सर्वसामान्यत:
      अनुभव ,
      मानसशास्त्र
      आणि मानवी जीवनाचा पिढ्यानपिढ्या अभ्यास
      करून काढलेले ठोकताळे असतात असे माझे मत आहे .
      या अनुषंगाने पुढील काळात विस्तृत लेख लिहिण्याचा प्रयत्न करेन .

      Delete
  6. बरोबर आहे आजकाल वास्तुशात्राने भारतीयांचा घाटाच लावला आहे.वास्तुशात्रावर बऱ्याच लोकांचा अंधविश्वास आहे त्यामुळे भटांचा धंदा वाढला आहे आणि बहुजनांचा खिसा खाली होत आहे.तसेच शुभ मुहूर्ताचे हि आहे.कधी सुधरतील आमचे लोक कुणास ठाऊक.

    ReplyDelete
    Replies
    1. sarvach gostinna apan andhaviswas nahi mhanu shakat, karan attachya kalat kahi bhat lok ya gostikade dhanda mhanun mantat. pan apalya vedamade je knowledge ahe te kahi chukiche nahiye. tyamule sarvach gosti chukichya mhanata nahi yenar. karan kahi gostincha anubhav mi swtaha getalay. shant karane vagerecha. tyamule farak padato.

      Delete
  7. charwak philosophy var mi a.r.salunkhe yanche "Aastik Shiromani Charwak" he pustak vachle hote. tya nantar tumche lekhan vachle. Khup khup aabhar ya vishayavar lihilya baddal. Charwak tatvdnyan majhya manala patate. Ajun hi vachaychay. Asa abhyaspurn likhan vachayla khup aavadte. Keep it up.

    ReplyDelete